Google

सोमवार, 26 दिसंबर 2011

ज्येष्ठ रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे कालवश



मुंबई - नाटकांना वेगळ्या वाटेवर नेणारे, रंगभूमीवर नवा इतिहास रचणारे प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांचे आज निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दुबेजींनी शांतपणे या जगाला निरोप दिला. त्यांच्या जाण्याने रंगमंचावरील एक धीरगंभीर आवाज आज शांत झाला आहे. ते अविवाहित होते. त्यांचे असंख्य शिष्यगण हेच त्यांचे गणगोत होते.

वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानी त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मराठी व हिंदी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. साडेसहा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने फक्त मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी व गुजराती नाट्यसृष्टीही शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या जाण्याने प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील रंगकर्मी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

नासिरूद्दीन शहा, आशुतोष गोवारीकर, रोहिणी हट्टंगडी मिता वशिष्ठ, विजय केंकरे, अरूण काकडे, अजित भुरे, नंदू माधव, राजपाल यादव आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर शिवाजीपार्क स्मशानभूमीत महेश भट्ट, नीना कुलकर्णी, सुलभा देशपांडे यांच्यासह नाट्यसृष्टीतील रंगकर्मींनी दुबे यांना श्रद्धांजली वाहिली.

दुबेजींना मिळालेले पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार ( १९७१)

सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( चित्रपट भूमिका, १९७८)

सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार ( चित्रपट जुनून, १९८0)

पद्मभूषण ( २0११)